फलटण चौफेर दि ३ ऑगस्ट २०२५
नागभीड, जि. चंद्रपूर येथून प्रेमासाठी जीवन संपवण्याचा निर्णय घेतलेल्या तरुण व अल्पवयीन मुलीला फलटण ग्रामीण पोलीस व स्थानिकांच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले. विषाची बाटली हातात धरून घेतलेला फोटो त्यांनी मित्रपरिवार व पोलिसांना पाठवल्यानंतर घटनाक्रम उघड झाला.याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी,नागभीड पोलीस ठाण्याचे ठाणेदार कोकाटे यांनी फलटण ग्रामीण पोलिसांना सायंकाळी ५.४० वाजता घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक सुनील महाडीक, पो.उप.नि. मच्छिंद्र पाटील, पो.ना. रण पिसे, होमगार्ड यांच्यासह उपळवे गावचे पोलीस पाटील प्रमोद डफळ, ग्राम सुरक्षा दलाचे जवान, तरुण मित्र व कारखाना सुरक्षा अधिकारी काळोखे यांनी तातडीने शोधमोहीम राबवली.फक्त अर्ध्या तासात सावंतवाडा-वेलोशी डोंगराळ परिसरातून दोघांना शोधून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या जवळून विषाची बाटलीही हस्तगत झाली. समुपदेशन करून आत्महत्येपासून परावृत्त करण्यात आले.मुलगी (वय १७) व तरुण अतुल उद्धव गायकवाड (वय २९, रा. वसला मेंढा, ता. नागभीड) हे एकाच गावचे असून, प्रेमासाठी शेकडो मैल दूर आले होते. कायदेशीर कारवाई पुढे होणार असली तरी दोघांचे प्राण वाचले हेच समाधान असल्याची प्रतिक्रिया पोलीस व ग्रामस्थांनी व्यक्त केली.